राजूर (जालना) : सातारा येथील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी हसनाबाद पोलिस ठाण्यातील कार्यरत होमगार्डने बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राजूर-टेभूर्णी रोडवरील एका ‘मोबाईल टॉवर’वर चढून आंदोलन केले. सदाशिव सांडून ढाकणे (वय ४०, रा. चांदई एक्को, ता. भोकरदन) असे टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या हाेमगार्डचे नाव आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त हसनाबाद पोलिस ठाण्यातील सर्व होमगार्ड यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलिस बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आले होते. त्यामुळे होमगार्ड सदाशिव ढाकणे हे बुधवारी सकाळी राजूर येथे कर्तव्यावर असताना अचानक राजूर-टेभूर्णी रोडवर असलेल्या एका ‘मोबाईल टॉवर’वर चढून त्यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी केली. त्यामुळे परिसरात बघ्याची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती वरिष्ठांना समजताच डीवायएसपी डॉ. गणपत दराडे, प्रभारी सहायक पाेलिस निरिक्षक सचिन खामगळ, पोलिस उपनिरिक्षक अर्चना भोसले, तलाठी विजग गरड, जमादार सुभाष डोईफोडे, रामेश्वर शिनकर, राहूल भागिले यांच्या पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
कर्मचाऱ्यानेच धरले पोलिस प्रशासनास वेठीस‘मोबाईल टॉवर’वर चढलेल्या होमगार्ड ढाकणे यांची डीवायएसपी डॉ. गणपत दराडे, प्रभारी सहायक पाेलिस निरिक्षक सचिन खामगळ यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत टॉवरवरून खाली येणार नसल्याचा पावित्रा यावेळी त्यांनी घेतला होता.
बघ्याची गर्दी, वाहतूक ठप्पराजूर-टेभूर्णी रोडवरील एका ‘मोबाईल टॉवर’वर होमगार्ड ढाकणे चढल्यानंतर रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी दुचाकीसह चारचाकी वाहनधारकही गाडी बाजूर लावून सुरू असलेला प्रकार पाहत होते. त्यामुळे परिसरात काहीवेळ वाहतूक टप्प झाली होती.
योग्य निर्णय न घेतल्यास विषारी द्रव्य घेणारआमदार शिवेंद्रराजे भोसले सर्वाधिक मतांनी निवडून आले आहे. तरीही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जात नाही. परंतु, जे आमदार एक हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जात आहे. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाहीतर मी सोबत आणलेले विषारी औषधी घेऊन जीवाचे काही बरेवाईट करणार आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या होमगार्ड पदाचा राजीनामाही दिलेला आहे.-सदाशिव ढाकणे, होमगार्ड, हसनाबाद पोलिस ठाणे.