लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देणाऱ्यांचे हात हजारो दुबळी माझी झोळी... या म्हणीचा प्रत्यय रविवारी जालन्यात आला. कुठल्यातरी कारणाने ज्यांच्या हाताला इजा होऊन एक हात निकामी झाला आहे, अशा रूग्णांना रोटरी क्लब आॅफ सेंट्रलने कृत्रिम हातांचे यशस्वी प्रत्यारोपण केले. जवळपास २५० जणांनी यासाठी नाव नोंदणी केली होती. पैकी रविवारी दिवभरात १२५ रूग्णांना कृत्रिम हात बसवून त्यांना कृत्रिम हातांनी कामकाज कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.रोटरी क्लबने यापूर्वी देखील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्रावर शस्त्रक्रिया करण्यासह नेत्रदानातही भरीव योगदान दिले आहे.याचाच एक भाग म्हणून हे कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन उद्योगपती रमेश पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बडजाते यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.सीटीएमके विद्यालयात आयोजित या शिबिरात अत्याधुनिक एल-एन-४ असा कृत्रिम हात प्रौढ दिव्यांग तसेच लहान मुलांना बसविण्यात आले आहेत. तसेच इतरही तपासण्या करण्यात आल्या आहेत. या शिबिरासाठी क्लबचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील बडजाते, रोटरी क्लब आॅफ पूना डाउनटाऊन तसेच रोटरी क्लब आॅफ निजामाबाद यांचे सहकार्य मिळाले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख डॉ. नीलेश सोनी, डॉ.श्रेयांस गादिया, सचिव सागर कावना आदींनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी दीड महिन्यापासून तयारी सुरू होती. सुरुवातीला राज्यभरातून ६०० जणांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. या शिबिरासाठी मिशन हॉस्पिटलच्या परिचारिका, तसेच डॉक्टरांनी परिश्रम घेतल्याची माहिती डॉ. बडजाते यांनी दिली. शिबीर यशस्वीतेसाठी रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी पुढाकार घेतला.
कृत्रिम हात बसवल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:14 AM