लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर: आईच्या दहाव्यासाठी दुधना नदीकाठी गेलेल्या ४५ वर्षीय मुलाचा बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाला. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह सायंकाळी ५ च्या सुमारास बाहेर काढण्यात आला.तालुक्यातील रोहिणा पुनर्वसन येथील किसन नामदेव आखाडे (४५) हे रोहिणा पुलाजवळील निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅकवॉटरवर कुटुंबीय व नातेवाईकांसह आईच्या दशक्रिया विधीसाठी गेले असता, ते आंघोळीसाठी खोल पाण्यात उतरले. पोहत दूरवर गेले अन अचानक बुडाले. नंतर नातेवाईकांनी आरडा-ओरड केली. स्थानिक मच्छीमार व पोहणा-यांनी रबरी होडीच्या साह्याने शोध घेतला. नगर पालिकेच्या अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाचा काहीच उपयोग झाला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजाभाऊ कदम हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक व परिसरातील पोहणा-यांना पाचारण करून बुडालेल्या किसन आखाडे यांना शोधण्याच्या कार्याला गती दिली. किसन आखाडे यांना पोहता येत असतांना ते अचानक बुडाले कसे, याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. मयत किसन आखाडे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.रोहिणा व आसपासचे पोहणारे निवृत्ती लिंबूरे, पंडित गव्हाणे, कृष्णा लिंबूरे, अरूण गुंजाळ यांनी पाण्यात उड्या घेऊन या मृतदेहाचा शोध सायंकाळी ५ च्या सुमारास लावला. यावेळी घटनास्थळी तहसीलदार राजेभाऊ कदम व पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव हे ही आपल्या ताफ्यासह उपस्थित होते.
आईच्या दशक्रियेसाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 1:08 AM