- संजय देशमुख
जालना : पीकविमा कंपन्या म्हणजे एकेकाळचा मटका किंग म्हणून प्रसिध्द असलेल्या रतन खत्री पेक्षाही भारी आहेत, खत्री ज्या प्रमाणे मटक्यावर ज्या आकड्यावर जास्त पैसे लावले आहेत, तो आकडा काढत नसे. त्याच धर्तीवर पीकविमा कंपन्यांचा कारभार असल्याचा सनसनाटी आरोप पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली.
पाणीपुरवठा मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी पिकविम्याबाबत जाब विचारला. यावेळी विमा कंपनीचा प्रतिनिधी या बैठकीस हजर होता. त्याला उठवून तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करित आहात. शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टाचा पैसा तुमच्याकडे मोठ्या आशेने गुंतवला आहे. परंतु काही मोजक्या पिकांनाचा हा नुकसान भरपाईचा लाभ देऊन विमा कंपन्यांनी हात वर केले आहेत. ही बाब गंभीर असून, ज्यांनी विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान झाले असेल तर भरपाई मिळालीच पाहिजे. तुम्ही तर रतन खत्री पेक्षाही भारी निघालात असे सांगून बैठकीत हशा पिकवून दिला. मात्र, हा मुद्दा हसण्यावर नेण्याचा नसल्याचे सांगून त्यांनी विमा कंपनीला एक प्रकारे सज्जड दमच भरला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी दानवे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एकूणच कारभारावर नाराजी व्यक्त करत तुमचे जेवढे वय आहे, तेवढा माझा राजकीय अनुभव असल्याचे सांगून प्रशासनातील त्रुटींवर गंभीर बोट ठेवले. तसेच जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी पाझर तलवासाठी संपादित केलेल्या मावेजाची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या हेडखाली वळवल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांनी चारशे कोटी रूपये भरलेजालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा काढण्यासाठी या विमा कंपन्यांकडे चारशे कोटी रूपयांपेक्षा अधिकचा विमा हप्ता भरला आहे. त्यामुळे त्यांनी चांगला परतावा मिळेल अशी आशा होती, मात्र, ती फोल ठरल्याने बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.
बैठकीस यांची उपस्थिती बैठकीस परभणीचे खासदार संजय जाधव, आ.नारायण कुचे, आ. संतोष दानवे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.