Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत आपले स्वतंत्र उमेदवार देणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. कारण जरांगे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. २८८ पैकी किती जागा लढायच्या, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबतचा निर्णय २९ ऑगस्ट रोजी होईल, अशी माहितीही जरांगे पाटलांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, "सरकार आरक्षण देत नसल्यामुळे आम्ही आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. २० ऑगस्टपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपआपल्या भागातील डेटा काढून आणायला सांगितला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपली कागदपत्रे काढून ठेवावीत, असं मी १५-२० दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. कारण तिकीट कोणालाही मिळालं तरी ऐनवेळी गोंधळ उडायला नको. आजपासून २० तारखेपर्यंत इच्छुक उमेदवार मला भेटणार असून मी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करेन. २० ऑगस्टपर्यंत सर्व भागातील उमेदवारांचा आणि त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. निवडणूक लढताना जातीवाद नसला पाहिजे. तो उमेदवार सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणार असावा, असा आमचा प्रयत्न असणार आहे," अशी माहिती जरांगे यांनी दिली.
दरम्यान, "जे राखीव मतदारसंघ असतील त्या मतदारसंघांमध्ये आम्ही आमच्या विचाराच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. त्या मतदारसंघांमधील मराठा समाज एकमताने आम्ही पाठिंबा दिलेल्या उमेदवाराच्या मागे उभा राहील. २० ते २७ ऑगस्ट या कालावधीत इतर जाती-धर्माच्या नेत्यांशीही चर्चा केली जाईल. कारण फक्त एका जातीच्या आधारे निवडणूक लढवणं हे कोणालाही सोपं नाही. सर्व जातींची समीकरणे जुळून यायला हवीत. यासाठी आम्ही आमच्या विचाराशी सहमत असलेल्या इतर समाजातील नेत्यांशीही चर्चा करू," असंही मनोज जरांगेंनी सांगितलं आहे.
महायुतीवर हल्लाबोल
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. "आरक्षण द्यायला बारा महिने लागत नाहीत. देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळांच्या नादात सत्ता घालून बसणार. आम्ही पूर्ण तयारीला लागलो आहे. पाडायचे की लढायचे आम्ही ठरवू पण तुमचा कार्यक्रम लावणार," असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला. मराठ्यांना लढावं लागणार हे लक्षात घेत मोठ्या संख्येने मराठा समाज एक येत आहे," असंही ते म्हणाले.