मुंबई- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचे अल्टिमेटम दिले होते, आज २४ ऑक्टोबरपर्यंत हे अल्टिमेटम होते. आज अल्टिमेटम संपला आहे. यामुळे आजपासून पुन्हा एकदा साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील आज स्वत: आमरण उपोषणासाठी बसणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची शिवछत्रपतींच्या चरणी शपथ, मनोज जरांगे म्हणाले, तरीही...
पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णयही जरांगे पाटील यांनी घेतला आहे. आज ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे. तर दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत आरक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटमचा काल मंगळवार २४ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता. अजुनही सरकारकडून कोणतीच घोषणा केलेली नाही. आता राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाला सुरुवात होणार आहे.
'आज २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार. नेत्यांनी आमच्या गावात यायच नाही, आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार, हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची शिवछत्रपतींच्या चरणी शपथ
सध्या राज्यात कळीचा मुद्दा ठरत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेत सर्वांना न्याय मिळवून देईन, अशी ग्वाही दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या कृतीनंतरही सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्र बनलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी असमाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली असेल तर ती चांगलीच बाब आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. जर तुम्ही ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. कारण ते कोर्टात टिकणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेवर आक्षेप असण्याचं कारण नाही. पण आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आम्ही सरकारला आणखी किती वेळ द्यायचा. आरक्षणासाठी लागणारे सर्व निकष आम्ही पूर्ण केले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाल मान दिला आहे. आता त्यांनी मराठ्यांच्या शब्दाचा सन्मान करावा. सरकारकडे आजची रात्र आहे. त्यांनी आरक्षाचा निर्णय या रात्रीत घ्यावा, अन्यथा उद्यापासून आम्ही लढायला सज्ज आहोत, असा इशारा जरांगे यांनी दिला.