Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष मागील दोन दिवसांपासून तीव्र झाला होता. फडणवीस यांच्यावर आरोप करताना मनोज जरांगे यांनी अपशब्दांचा वापर केला होता. यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर आमदारांनीही जरांगे यांच्यावर प्रतिहल्ला केला. त्यानंतर अखेर जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत.
"देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम्ही शिवराळ भाषेचा वापर केला. हा मुद्दा त्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. याबाबत तुमची काय भूमिका आहे?" असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, "हो, मी पण बघितलं की त्यांनी विधानसभेच्या पटलावर छत्रपती शिवरायांचं नाव घेत हा मुद्दा मांडला आणि कोणाच्या आई-बहिणीवरून बोलणं योग्य आहे का, असं म्हटलं. मात्र मी देखील माय-माऊलींचा सन्मान करतो. अनावधानाने ते शब्द माझ्या तोंडून गेले असतील, कारण १७-१८ दिवस पोटात अन्न नव्हतं. ते शब्द मी मागे घेतो आणि दिलगिरीही व्यक्त करतो," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात सोमवारी रात्रीपासून उपचार घेत आहेत. जरांगे यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारने घेतलेल्या एसआयटी चौकशीच्या मुद्द्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. "शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या महिला आणि अबाल वृद्धांवर लाठीहल्ला आणि गोळीबार करणाऱ्या पोलिसांची ही चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. आपल्याला अडकवण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचे मी तीन दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथील समाजबांधवांना सांगितलं होतं. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवावर गुन्हे दाखल केले जात आहेत. हे सरकार आता सत्तेचा दुरुपयोग करत आहे," असा आरोपही यावेळी जरांगे पाटलांनी केला होता.