लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : शासनाने दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी आरक्षण द्यावे; अन्यथा २५ तारखेनंतर सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि २८ ऑक्टोबरपासूनचे आंदोलन सरकारला पेलणार नाही, असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शांततेचे युद्ध काय असते, हे सरकारला आणि देशाला दाखवून देऊ, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी शासनाला दिलेली मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याची माहिती देण्यासाठी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे बोलत होते. ते म्हणाले की, सरकारने घेतलेल्या मुदतीत मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर केले नाही, तर २५ तारखेपासून आपण अन्नपाणी त्याग करून आमरण उपोषणास पुन्हा सुरुवात करणार आहोत. या कालावधीत उपचारही घेतले जाणार नाहीत. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊन आले, तरच गावाची शिव ओलांडू देणार आहोत.
आंदोलनाची रुपरेखा
२५ तारखेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक सर्कलमधील मोठ्या गावांत साखळी उपोषण केलेे जाईल. २८ पासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होईल. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात कॅण्डल मार्च काढावा. दुसऱ्या टप्प्यातील आरक्षणाची दिशा २५ ऑक्टोबरला जाहीर करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.