चिपळूण/वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांची मागणी याेग्यच आहे. त्यासाठी राज्य शासनानेच पुढाकार घेऊन न्याय द्यायला हवा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले.
दरम्यान, गत तीन दिवस तणावात असलेल्या वडीगोद्रीतील ओबीसी उपोषणस्थळ परिसरात सोमवारी दिवसभर शांतता दिसून आली. दुसरीकडे मराठा समाज बांधवांनी सोलापूर - धुळे महामार्गावरील रामगव्हाण फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
आता पाणीही पिणार नाही : जरांगे
मराठ्यांवर सुरू असलेला अन्याय महाराष्ट्र पाहात आहे. त्यांनी सुरुवात केली, शेवट मी करेन. मी आता उठणार नाही अन् पाणीही पिणार नाही,असा इशारा मनोज जरांगे -पाटील यांनी दिला.
...तुम्हाला राजा म्हणणार नाही : हाके
जरांगेंच्या बॅनरवर राजर्षी शाहू राजांची प्रतिमा वापरली नाही, तरी तुम्हाला ते दिसतात. पण अठरा पगड जाती दिसत नाहीत. रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही, या शब्दात लक्ष्मण हाके यांनी सभाजीराजे यांच्यावर टीका केली.
संभाजीराजे जरांगेंना भेटले
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा सोमवारी सातवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली. जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात ठिकठिकाणी सोमवारी बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.
आंदोलकांवर लाठीमार
नांदेड : मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सोमवारी नांदेड बंद पुकारण्यात आला होता. कार्यकर्ते दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याचवेळी भाग्यनगर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यात चार ते पाचजण जखमी झाले आहेत.