- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : प्रशासन किंवा शासनाचे प्रतिनिधी भेटीला आले नाही म्हणून उपोषण थांबणार असं होणार नाही. मराठा आणि कुणबी यांच्यात रोटीबेटी व्यवहार होतो. त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी आमची मागणी आहे. यासाठी उद्यापासून कठोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज जाहीर केले. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे म्हणाले, उद्या सकाळी १० वाजता कठोर बेमुदत उपोषण सुरू होणार. सरकारने आम्ही सांगितलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी केली. छगन भुजबळ हेच आमचे एकमेव विरोधक आहेत. भुजबळ यांनी धनगर आरक्षणाबाबत बोलावं. जे भुजबळ यांच्या नादी लागत नाही, ते पुढे जातात. महादेव जानकर साहेब हे छगन भुजबळ यांच्या नादी लागले नाहीत, म्हणून ते आज पुढे गेले, असा टोला जरांगे यांनी भुजबळ यांना लगावला.
काल आमदार राजेंद्र राऊत मला भेटायला आले होते. त्यांनी उपोषणा आधी शंभुराजे देसाई यांच्याशी मुंबईत भेटायला या म्हणून विंनती केली. त्याला मी नकार दिला. मात्र, छत्रपती संभाजीनगरला बैठकीसाठी जायला मी तयार झालो होतो. पण शंभूराजे देसाई आज सातारा येथील कार्यक्रमात असल्यानं ही बैठक शक्य झाली नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना सगळे गुन्हे मागे घ्यायला सांगा, अशी मागणी जरांगे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडे केली.
पोलीस भरतीत मराठा मुलांना अडथळेजातीयवादी अधिकारी मुद्दामहून मराठा मुलांना पोलिस भरतीमध्ये अडथळे आणत आहेत. या भरतीत मराठा मुलांचं वाटोळं होत आहे. मराठ्यांसोबत भरतीत डाव केले जात आहेत. या भरतीत सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र देण्याची अट ठेवा. तसेच सर्व मुलींना शिक्षण मोफत केले तर मग अटीशर्थी कशाला ठेवल्या? त्या हटवा. ओबीसींच्या सवलती मुलींना लागू करा असे आवाहनही जरांगे यांनी सरकारला केले.