जालना : "राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचेही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे. मागणी मान्य झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार आणि तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शनिवारी ८ जून रोजी अन्नपाण्याचा त्याग करून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा डाव टाकत आहे. त्यामुळेच काहीजण निवेदने देत आहेत. परंतु, आचारसंहिता असतानाही अनेक उपोषणे सुरू होती. आम्ही आचारसंहितेचा आदर करीत ४ जून चे उपोषण ८ जून रोजी सुरू केले आहे. आम्ही आमच्या मागणीसाठी उपोषण करतोय तेव्हा जातीवाद वाटतोय. मग सकल मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे निघाले. आमच्या सभा झाल्या त्यावेळी त्यांनी राज्यभर सभा घेतल्या तो जातीवाद नाही का असा सवाल त्यांनी केला. शांततेत आंदोलन करण्याचा लोकशाहीने अधिकार दिला असून, मी ते करीत आहे. कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे ती त्यांनी पार पाडावी. आपण मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत," असे ते म्हणाले.
शेती कसा, अंतरवालीकडे येवू नका
"सर्वांना वाटत होते मराठ्यांची एकजूट होणार नाही, मतात रूपांतर होणार नाही. परंतु, मराठ्यांची एकजूट लोकसभा निवडणुकीत दिसून आलेली आहे. आपली उपजिविका शेतीवर भागते. त्यामुळे अगोदर कसा आणि नंतर इकडे या. राज्यात कोठेही उपोषणे, आंदोलने होणार नाहीत," असेही जरांगे पाटील म्हणाले.
मुलींना मोफत शिक्षण द्या, ओबीसीचा पर्याय खुला करा
"प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे घेतलेल्या निर्णयानुसार मुलींना मोफत शिक्षण द्यावे. जीआरची अंमलबजावणी करावी. याबरोबरच एसीबीसीतून नोकरभरती, शिक्षणासाठी अर्ज भरलेल्या आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ओबीसीतून अर्ज भरण्याचा पर्याय खुला करावा," अशी मागणी त्यांनी केली.
सर्व आमदारांनी प्रश्न मांडावा
आमचे उपोषण सुरू झाले की काही आमदार ओरडतात. त्यामुळे भाजप-सेनेच्याच नव्हे तर सर्वपक्षीय आमदारांनी आपल्या नेत्यांकडे मराठा आरक्षणाचा विषय मांडून तो तातडीने मार्गी काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आवाहन जरांगेंनी केलं.