Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी इथं उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. आज मध्यरात्रीपासून जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्यावर आपण १७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून उपोषणास सुरुवात करणार आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून त्यांनी उपोषणास सुरुवात केली असून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. "पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत, जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही," असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
"हे शेवटचे उपोषण"
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, "त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यातील सर्व घटनांना सरकार जबाबदार असेल. हे शेवटचे आंदोलन असेल आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुम्हाला बोंबलत बसावं लागेल," असा हल्लाबोल त्यांनी सरकारविरोधात केला आहे.