वडीगोद्री ( जालना) : ''सरकारकडून सांगण्यात आले विषय तडीस नेतो, म्हणून सलाईन लावले त्यांनी तडीस न नेल्यास सलाईन पुन्हा काढून टाकेल. विषय तडीस गेल्याशिवाय मी मागे हटणार नाही. '', असा इशारा बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत. मंगळवारी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आले. आज सकाळपर्यंत ४ सलाईन संपल्या आहेत.
दरम्यान, मध्यरात्री बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांच्यासोबत बातचीत केली. यावर जरांगे म्हणाले, ते निरोप घेऊन आले होते. तो कोणत्याही पक्षाचा आमदार असो, मला त्याच्याशी घेणंदेणं नाही. मात्र, मदतीसाठी ते प्रयत्न करत आहेत. चर्चा तर घडून आलीच पाहिजे. सरकारने त्यांच्यामार्फत सांगितले आहे की, आम्ही ताबडतोब विषय तडीस काढू. फक्त सलाईन लावून घ्यावी. सरकारच्या शब्दाला मान देऊन सलाईन घेतले. त्यांनी विषय तडीस नेला नाही तर पुन्हा सलाईन काढू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.
आज शिष्टमंडळ भेटणार 'सगेसोयरे'च्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत. अंमलबजावणी करायची असल्यास एवढा वेळ थोडाच लागतो. आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे, नाही कळलं तर सलाईन काढून टाकू. एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक नाही. मी समाजासाठी मरेपर्यंत लढणार असल्याचेही जरांगे म्हणाले. तसेच आज दुपारी सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीस येणार असल्याची माहिती आहे.
छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका''त्याला काही कळत नाही, ते कामातून गेलेले. एवढा ओबीसी अडचणीत आला असता का? बधीर आहे तो'', असा हल्ला जरांगे यांनी मंत्री भुजबळ यांचेवर चढवला. तसेच लक्ष्मण हाके अंतरवाली सराटी येथे उपोषण करणार असल्याची माहिती आहे. ''कुठून पण उपोषण कर, मी आणि माझा समाज किंमत देत नाही'', अशी भूमिका हाके यांच्यावर जरांगे यांनी व्यक्त केली.