आंतरवाली सराटी (जि. जालना) : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीत समाविष्ट करा. त्यासाठी येत्या २४ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन आहे. दहा दिवसांत आरक्षण द्या, नाहीतर पुढची जबाबदारी ही सरकारचीच असेल, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी येथे विशाल जनसमुदायाच्या साक्षीने दिला. पुढील आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबर रोजी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा समाजाचं विराट दर्शन घडवलं. तर, काही नेत्यांवर कडक शब्दात टीकाही केली. या लढवय्या जरांगे पाटलांमधील हळवा बापमाणूसही या सभेदरम्यान पाहायला मिळाला.
आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे तब्बल १५० एकरपेक्षा अधिकच्या मैदानात जरांगे यांची शनिवारी सकाळी जाहीर सभा झाली. या सभेसाठी जरांगे पाटलांचं संपूर्ण कुटुंबही सभास्थळी आलं होतं. त्यांच्या आईनेही सभास्थळी येत सर्वांना हात उंचावून अभिवादन केलं. त्यावेळी, मराठा समाजानेही टाळ्या वाजवून दाद दिली होती. दरम्यान, सभास्थळी जरांगे पाटील यांच्या मुलीला चक्कर आली. त्यावेळी, कडक आणि लढवय्या माणसातील बापमाणूस उपस्थितांनी पाहिला. जरांगे पाटलांनी लगेच आपल्या लेकीला जवळ घेतलं, जवळच असलेलं वर्तमानपत्र घेऊन पेपरने वारा घातला. त्यानंतर, पाणीही दिलं. समाजासाठी घरापासून दूर राहिलेल्या जरांगे पाटलांचं कुटुंबवात्सल, प्रेम पुन्हा एकदा दिसून आलं.
दरम्यान, यापूर्वी उपोषण सुरू असताना जरांगे पाटील कुटुंबाबद्दल बोलताना भावूक झाले होते. एकतर मराठा समाजाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली होती. तसेच, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत घराचा उंबरठाही ओलांडणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. अंतरवालीतील सभेतही त्यांनी पुन्हा तीच शपथ घेतली. सरकारला दिला इशारा
बोलताना ते म्हणाले, ३० दिवसांपूर्वी उपोषण मागे घेताना सरकारने आरक्षणाचा शब्द दिला होता. त्या शब्दावर मराठा समाज ठाम आहे. ४० दिवस सरकारला कोणीही आरक्षणाविषयी विचारणार नाही. मात्र, ४० दिवस होताच सरकारची काही खैर नाही. मराठा समाज याठिकाणी शांततेत आला आहे. पोलिसांनाही संपूर्णपणे मदत केली आहे. संघर्ष आणि त्रास सहन केल्याशिवाय गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही.
मराठ्यांत फूट पाडण्याचा डाव
मराठा समाज एकत्र आला आहे. त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखी माणसे सोडली आहेत. त्यामागे दोन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असल्याचा आरोप जरांगे-पाटील यांनी यावेळी केला. तसेच या सरकारने भीतीपोटी माझे फेसबुक पेजही बंद केल्याचे त्यांनी सांगितले.
एक इंचही मागे हटणार नाही
आरक्षण मिळाल्याशिवाय इंचही मागे हटणार नाही, हा आज शब्द देतो. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी तयारी असेल. आरक्षण मिळविण्याचे मराठा समाजाचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. हे मराठ्यांचे आग्या मोहळ शांत आहे. ते शांतच ठेवा. ते एकदा का उठले तर सरकारला कठीण जाईल. - मनोज जरांगे-पाटील
शासनाकडे मागण्या
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या.कोपर्डीच्या नराधमांना तत्काळ फाशी द्या.मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या ४५ बांधवांच्या वारसांना सरकारी नोकरी व निधी द्या.१० वर्षांनी ओबीसी जातींचे सर्वेक्षण करून मागासलेपण दूर झालेल्यांचे आरक्षण रद्द करा.मराठा समाजाला व्हीजेएनटी सारखा प्रवर्ग करून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्या.
छगन भुजबळ यांच्यावर तिखट टीका
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सभेसाठी सात कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला. त्यावर जरांगे-पाटील यांनी तिखट शब्दांत टीका केली. आम्ही १०० एकरांत सभा घेत होतो, ती काही जमीन विकत घेतली नाही. सगळं शेत शेतकऱ्यांनी सभेसाठी फुकट दिलंय.
गोरगरीब मराठ्यांचे रक्त पिऊन तुम्ही (भुजबळ) मोठे झालात. जमीन खरेदी केल्या. त्यामुळेच तुम्ही आतमध्ये (जेल) बेसन खाऊन आलात. गोदाकाठच्या १२३ गावांनी पैसे जमा केले. सभेसाठी २२ गावांचे २१ लाख लागले.
उर्वरित गावांचे पैसे त्यांच्याकडेच जमा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही छगन भुजबळ यांना योग्य शब्दांत समज द्या, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.