वडीगोद्री (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या प्रयत्नांना शंभर टक्के यश येणार आहे. जरांगे यांनी उपोषण थांबवावे, लढा थांबवू नये, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले.
संभाजी भिडे यांनी मंगळवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. मनाेज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले उपोषण हे योग्य आहे. शासनस्तरावरून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांबद्दल विश्वासाचा शब्द आहे. हे तिन्ही जरांगे यांना जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय थांबणार नाहीत. या आंदोलनाला यश येण्यासाठी राजकीय लोकांकडून पाहिजे ते करून घेण्याची जबाबदारी मनोज जरांगे यांनी माझ्याकडे टाकावी. या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात होईल, असा विश्वासही भिडे यांनी व्यक्त केला.
मला बळ मिळालेअंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची मंगळवारी सकाळी संभाजी भिडे यांनी भेट घेवून चर्चा केली. संभाजी भिडे यांनी उपोषणस्थळी भेट दिल्याने मला आणखी बळ मिळाल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
खोतकर, भुमरेंकडून विनंतीमाजी मंत्री अर्जुन खोतकर, रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी मंगळवारी सकाळी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत झालेली चर्चा आणि घेतलेल्या ठरावाची माहिती त्यांनी जरांगे यांना दिली. जरांगे यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.