जालना/छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आपल्या सगेसोयरे अंमलबजवाणीच्या मागणीवर ठाम आहेत. त्यातूनच, ते दररोज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आवाहन करतात. तर, राज्य सरकारला इशारा देतात. शुक्रवारी त्यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, ते रुग्णालयात अंतरवालीत पोहोचलो. मात्र, मध्यरात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालयातून रात्रीच डॉक्टर अंतरवालीत पोहोचले होते. त्यानंतर, डॉक्टरांनी ईसीजी काढून तपासणी केली असता घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, जरांगेंसह त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला.
मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यामुळे, त्यांची प्रकृती खालावली, अखेर ग्रामस्थ आणि मराठा बांधवांच्या आवाहानानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले. त्यानंतर, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर जरांगे यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. मात्र, शनिवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर, छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तात्काळ आंतरवालीत पोहचले. जरांगे यांच्यावर रात्रीच तातडीने उपचार सुरु करण्यात आले. रात्री दहा आणि दीड वाजता जरांगे यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. त्यात, कुठलाही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी आंतरवालीतच त्यांच्यावर उपचार केले.
ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्याकुटुंबासह ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला. सध्या त्यांची प्रकृती बरी असून ते आजही पत्रकार परिषद घेऊ शकतात. दरम्यान, मनोज जरांगे यांनी ३ मार्च रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. त्यामुळे, आज पत्रकार परिषद घेऊन ते नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.