लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव राजा : अचानक उच्च दाबाचा वीजपुरवठा झाल्याने देऊळगाव राजा येथील अनेकांच्या घरातील पंखे, टीव्ही संचसह इतर उपकरणे जळाली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना घेराव घातला. तसेच नुकसान भरपाईची मागणी लावून धरली होती.शहरातील पिंपळनेर परिसरात सोमवारी दुपारी या भागात अचानक उच्च दाबाने वीज पुरवठा झाला. त्यावेळी जवळपास ४० ते ५० कुटुंबातील फॅन, टीव्ही संचसह इतर उपकरणे जळाली. घटनेनंतर वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता विजय कायंदे, लाईनमन माळोदे, खरात हे पिंपळनेर परिसरात आले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालून झालेल्या नुकसानी संदर्भात भरपाईची मागणी केली. त्यावेळी आम्ही झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवू शकतो. नुकसानीची भरपाई करणे आमच्या अधिकारक्षेत्रात नाही, अशी भूमिका कायंदे यांनी मांडली. त्यावेळी महिला व युवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सुमारे दोन तास वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकसानग्रस्त नागरिकांनी घेराव घातला होता. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र खांडेभराड यांनी वितरण कंपनी व पिंपळनेर येथील रहिवाशांमध्ये समेट घडवून आणला.
विजेच्या उच्च दाबामुळे जळाली अनेक उपकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:21 AM