लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन - हसनाबाद- जवखेडा- राजूर- देऊळगाव राजा या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील रखडलेल्या ६ किलोमीटर रस्त्यावरील भूसंपादनाबाबत गुरूवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या उपस्थितीत २५९ शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी ८० टक्के शेतक-यांनी भूसंपादन करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे अपूर्ण असलेले काम पूर्णत्वास जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.कुंभारी पाटी ते हसनाबाद - राजूर - देऊळगाव राजा या ६५ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नामुळे ३१८ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. या रस्त्याचे ९० टक्के काम सुद्धा पूर्ण झाले आहे. मात्र ज्या गावातून हा रस्ता जातो त्या ठिकाणच्या शेतकरी व नागरिकांनी काम बंद केले होते. त्यामुळे गुरूवारी तहसील कार्यालयात शेतक-यांची बैठक झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड, अभियंता सचांद शुक्ला, अॅड. सुनील चावरे, भूसंपादन विभागाचे अधिकारी, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिका-यांसह २५९ शेतकरी बैठकीस उपस्थित होते. यावेळी रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी बिनवडे यांनी शेतक-यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन केले. त्यानंतर उपस्थित अनेक शेतक-यांनी भूसंपादनास मंजुरी दिली.रखडलेल्या ६ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी शेतक-यांना शासनाच्या नियमानुसार मोबदला मिळणार आहे. त्यामुळे गुरुवारी अनेक शेतक-यांनी आपली जमीन देण्यासाठी समंती दिली आहे. उर्वरित शेतकरी सुध्दा जमीन देण्यासाठी अनुकूल आहेत. त्यासाठी आम्ही प्रत्येक गावात जाऊन तीन दिवसात संमती मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- शिवकुमार स्वामी,उपविभागीय अधिकारी, भोकरदन
भूसंपादनास अनेक शेतकऱ्यांची संमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:06 AM