लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालना लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी रॅली, कॉर्नर बैठका आणि थेट मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात विभागलेल्या या मतदार संघात युतीचे अनेक बडे नेते प्रचारात उतरल्याने रंगत वाढली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात चिकलठाणा, करमाड, सिल्लोड याप्रमाणेच जालना जिल्ह्यातील जालना शहर आणि अन्य तालुक्यांमध्ये प्रचारसभा होत आहे. जालना शहरात मंगळवारी मोठी रॅली काढण्यात आली होती. तर दोन दिवसांपूर्वीच गोकुळनगरीमध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जि. प. सदस्य शालीकराम म्हस्के यांनी कॉर्नर बैठक घेतली. यासह अंबड तालुक्यातही माजी आ. अॅड.विलास खरात हे वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन दानवेंना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. दानवे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात असल्याने आपण प्रत्येकाने दानवे यांचे दूत म्हणून काम केले पाहिजे. असे आवाहनही अॅड. खरात यांनी केले.करमाड येथे पार पडलेल्या प्रचारसभेत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत दानवेंच्या प्रचारार्थ बैठक झाली. यावेळी दानवे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी बागडे यांनी केले. या बैठकीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. जिजा कोरडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, किसान सेनेचे नाना पळसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दामूअण्णा नवपुते आदींची उपस्थिती होती. चिकलठाणा येथेही डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे उपाध्यक्ष किशनचंद तनवाणी, आ. अतुल सावे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरूळे, माजी महापौर घडामोडे, बाबासाहेब डांगे आदींची उपस्थिती होती.जिल्ह्यात दानवेंच्या प्रचाराला वेग आला असून, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले, राजेश राऊत आदी कार्यकर्ते प्रचारार्थ गावोगावी दौरे करत आहेत. सिल्लोड येथेही खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ सुरेश बनकर यांच्या उपस्थितीत प्रचारसभा झाली. दानवेंनी गेल्या पाच वर्षात सहा हजार कोटी रूपयांचा निधी आणून विकास कामे केल्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर यांनी सांगितले.
दानवेंच्या प्रचारार्थ दिग्गज मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:43 AM