लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चीनमध्ये दहशत माजविणाºया कोरोनाचे संशयित रूग्ण भारतातही आढळून आले आहेत. या धर्तीवर दक्षतेचा उपाय म्हणून जालना जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या आजाराच्या दहशतीमुळे शिंकणाऱ्यांपासून नागरिक दोन हात लांब राहत असून, रूग्णालयातील डॉक्टरांनीही मास्क वापरण्यावर भर दिला आहे.गत काही महिन्यांपासून चीनसह इतर देशात कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. कोरोनाबाबत दक्षतेचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या धर्तीवर जिल्हा शल्यचिकित्सक एम. के. राठोड यांनी जिल्हा रूग्णालयात कोरोना संशयित रूग्ण आढळला तर त्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षासाठी स्वतंत्र दोन तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कक्षात व्हेंटेलेटरसह इतर अत्यावश्यक यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. शिवाय तालुका व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिका-यांना कोरोनाबाबत घ्यावयाची दक्षता, उपचार याबाबतही माहिती देण्यात आली आहे. एखादा संशयित रूग्ण आढळून आला तर त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठविण्याचेही सूचित करण्यात आले आहे. जिल्हा रूग्णालयात सर्दी, खोकल्याचे रूग्ण आढळून येत आहेत. मात्र, कोरोना संशयित रूग्ण आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले.कोरोना आजाराची दहशत मात्र, जिल्हा रूग्णालयात येणा-या रूग्ण, नातेवाईकांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांमध्येही दिसून येत आहे. अनेक डॉक्टरांनी बाह्यरूग्ण विभागात येणा-या रूग्णांची तपासणी करताना मास्कचा वापर केला होता. विशेषत: बाह्यरूग्ण विभागातील कक्षात अचानक अधिक रूग्ण आल्यानंतर संबंधित डॉक्टरही रूग्णांवर ओरडत असल्याचे गुरूवारी सकाळी दिसून आले.अशी घ्या दक्षतानियमित हात धुवावेत, सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरावा, सर्दी-खोकल्याचा त्रास अधिक असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, शारीरिक आणि परिसराची स्वच्छता ठेवावी. कोणत्याही अफवांना बळी न पडता वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.
शिंकणाऱ्यांपासून अनेक जण दोन हात लांब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 12:22 AM