पवन पवार
वडीगोद्री : रविवारी सकाळी सात वाजता राज्यातील सगळ्या उमेदवारांना अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले म्हणाले. अंतरवाली सराटीत दलित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांनी बैठक घेतली असून बैठकीत जागेच्या बाबत चर्चा झाली. उद्या पुन्हा चर्चा होईल असे जरांगे यांनी सांगितले आहे.
आता ३ नोव्हेंबर रोजी उमेदवार कोण या सस्पेन्सवरून पडदा हटणार आहे. उद्या ते मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल हे जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अंतरवाली सराटीत दलीत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक पार पडली. या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्यावतीने माजेद शेख हे उपस्थित होते.
मराठा, मुस्लिम आणि दलीत हे समीकरण जुळल्यानंतर आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जागेच्या बाबत चर्चा झाली, उद्या पुन्हा चर्चा होईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलीय. उद्या सकाळी 7 वाजता राज्यातील सगळे उमेदवार अंतरवाली सराटीत चर्चेला या असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदार संघ आणि उमेदवार यांच्या नावाची उद्या मनोज जरांगे घोषणा करण्याची शक्यता असून उद्या सायंकाळी पाच किंवा रात्री आठ किंवा १० वाजेपर्यंत चांगला निर्णय होईल, असं जरांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या देशात रेशीमबागेला अंतरवाली चॅलेंज ठरेल असं वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केलं आहे. या महाराष्ट्रात जरांगेंच्या हाती सत्ता यावी ही सर्वांचीच अपेक्षा असल्याचं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलं. दिवाळी पाडव्या निमित्त मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी उमेदवार व नेते मंडळी यांनी गर्दी केली होती.