जालना - मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू झालेला संघर्ष थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी गावात पाऊल ठेवू नये, अशी भूमिका घेत राज्यातील अनेक ठिकाणी गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यात हा मुद्दा आणखीनच संवेदनशील झाला आहे. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा जालन्यातील अंबड तालुक्यातील एका गावात आला. गावबंदी जाहीर केलेली असतानाही गावात गेल्याने भाजप आमदार नारायण कुचे यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
अंबड तालुक्यातील शिरढोण येथे एका कार्यक्रमासाठी नारायण कुचे आले होते. मात्र आमदार कुचे गावात आल्याचं कळताच मराठा तरुण जमले आणि त्यांनी कुचे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी मराठा तरुण आणि नारायण कुचे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र तरुणांचा रोष लक्षात घेत नारायण कुचे यांनी शिरढोण येथून काढता पाय घेतला.
गावबंदीचे फलक आणि भुजबळांचा इशारा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी अंबड तालुक्यातच ओबीसी नेत्यांची मोट बांधत जाहीर सभा घेतली होती. यावेळी जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देताना छगन भुजबळांनी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजालाही डिवचलं होतं. आमदारांना गावबंदी, खासदारांना गावबंदी, अरे महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय का? असा सवाल भुजबळ यांनी विचारला होता. तसंच पोलिसांनी तात्काळ हे फलक काढून टाकावेत, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर काही ठिकाणी अज्ञातांकडून गावबंदीचे फलक फाडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेलं असतानाच आज पुन्हा भाजपच्या एका आमदारावर गावातून माघारी फिरण्याची नामुष्की ओढावली आहे.