जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंबड तालुक्यातील शहागड येथील पैठण फाटा येथे मंगळवारी गोदाकाठीच्या १५० गावांतील ५० हजारांहून अधिक मराठा समाजबांधव एकवटले होते. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा आदी घोषणा देण्यात आल्या.
मंगळवारी सकाळपासूनच आंदोलनकर्ते शहागड येथे दाखल होत होते. आंदोलनात ५० हजारांपेक्षा अधिक मराठा समाजबांधव सहभागी झाले. त्यांच्या हातात आरक्षणाच्या मागणीचे फलक होते. आंदोलकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुस्लीम समाज बांधव व मराठा स्वयंसेवकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. आंदोलनामुळे सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग जवळपास सहा तास ठप्प झाला होता. वाहनांच्या दुरपर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हे सरकार नाकर्ते सरकार आहे. वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पाठीमागे हटणार नाही. तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, हे बलिदान व्यर्थ जाऊ नये. बलिदान दिलेल्या तरुणांच्या घरच्यांना नोकरी व शासन मदत मिळावी, जिल्ह्याच्या ठिकाणी मुली व मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात यावे, अशी मागणी करून ते म्हणाले की, शासनाने वेळोवेळी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळेच आम्हाला जनआक्रोश आंदोलन करावे लागत आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद अघाव, गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके आदींची उपस्थिती होती.