रामनगर : तालुक्यातील बाजीउमरद येथे २० ते २५ युवक टॉवरवर चढून आंदोलन करीत होते. याची माहिती प्रशासनाला दिलेली असतांनाही तहसीलदार लवकर न आल्याने नागरिकांनी रविवारी तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या. शिवाय, जालना -मंठा रोडवर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी चार ते पाच बसवर दडफेक करण्यात आली आहे.
बाजीउमरद येथील काही युवक टॉवरवर चढून आंदोलन करीत होते. याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती. तहसीलदार छाया पवार या सायंकाळी येणार होत्या. परंतु, दुपारी दोन वाजेपर्यंत त्या आल्या नाही. दोन वाजता आल्यानंतर ग्रामस्थ आणि तहसीलदार छाया पवार यांच्या मध्ये वादावादी झाली. त्यानंतर काही जणांनी तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या. चार ते पाच बसेसच्या काचा देखील फोडण्यात आल्या आहेत.
जालना ते मंठा मार्गावर साखर कारखान्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मौजपुरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.