जालना: मराठा समाजाच्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबावणी करण्यासाठी वडीकाळ्या गावात सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण आता अन्य गावातही पसरू लागले आहे. मंगळवारी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यामुळे करंजळा, जालुरा, भोगगाव येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून सरकारविरोधात रोष व्यक्त केला. या आंदोलनाला आणखी आक्रमक स्वरूप येण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाच्या सरकारने मान्य केलेल्या १४ मागण्यांची अंमलबजावणी करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी यासाठी चार दिवसांपासून अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावात मनोज जरांगे यांच्यासह गावकरी उपोषणाला बसले आहेत. चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. ही बातमी अन्य गावात पसरल्यानंतर करंजळा, जालुरा, भोगगाव या गावातील मराठा समाजाने गावातच रास्ता रोको आंदेालन केले. यामुळे गाव परिसरातील मुख्य मार्गाची वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांच्यासह पोलिस अधिकारी उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी गावकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, सरकारने आंदोलकांना पत्र पाठवून मान्य केलेल्या मागण्यांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. परंतु, निर्णय होऊन अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे.