Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तुमच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचं सांगत सरकारकडून जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय माघार नसल्याचे जरांगे यांनी जाहीर केल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारचे एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. परंतु सरकारने उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा आमच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करू, असा इशारा आता मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे.
"सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला १२-१२ महिने लागतात का? मी सरकारसोबत चर्चा करण्यासाठी कायम तयार आहे. मात्र त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यांचं शिष्टमंडळ येणार असल्याचं म्हणत आहेत, पण कधी येणार आहे ते माहीत नाही," असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
सरकारच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश?
मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज सरकारकडून पाठवण्यात येणाऱ्या शिष्टमंडळात मंत्री शंभूराज देसाई, तानाजी सावंत आणि राजेंद्र राऊत यांचा समावेश असू शकतो, अशी माहिती आहे. जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कशा प्रकारे काम सुरू आहे, याबाबतची माहिती सदर शिष्टमंडळाकडून दिली जाणार आहे. तसंच जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे. या विनंतीला ते कसा प्रतिसाद देतात, हे पाहावं लागेल.
ओबीसी नेत्याला घेतलं ताब्यात
ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी येथे उपोषण करण्यास जात होते. ही माहिती पेालिसांना मिळाल्यानंतर हाके यांच्या लोकेशनची माहिती घेऊन त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, रात्रीतच हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले. हाके हे माढा लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. यापूर्वी ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यात त्यांनी अतिशय प्रखरपणे आपली भूमिका मांडली होती. आता अंतरवाली सराटी इथं मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सावधानतेची भूमिका घेतली आणि हाके यांना ताब्यात घेऊन उपोषण न करण्याबाबत आवाहन केलं आहे.