लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठी भाषेच्या या वैभवशाली अस्मितेचा व स्वाभिमानाचा पाया सर्वप्रथम श्री चक्रधर स्वामींनी व त्यांच्या महानुभाव पंथाने रचला आहे. याला इतिहास साक्ष आहे. या मराठी वाड.मयाचे उगमस्थान अर्थातच लीळाचरित्राचे लेखनस्थळ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे आहे. त्यामुळे मराठी विद्यापीठ येथे होणे गरजेचे आहे. परंतु मुख्यमंत्री हे विद्यापीठ मुंबईला स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तो रद्द करून रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव म्हणाले की, वडोदरा येथे नुकत्याच झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांना मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच स्थापन करण्याची मागणी आम्ही केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी रास्त असल्याचेही सांगून राज्य सरकार याचा सकारात्मक विचार करेल, असा शब्द आपल्या भाषणातून दिला होता. परंतु आता हे विद्यापीठ मुंबईत स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. श्रीनागदेवाचार्य, श्रीम्हार्इंभट्ट, आद्य कवयित्री महदंबा आदी महानुभावांनी मराठी भाषेत विविध विषयांवर ६५०० ग्रंथ लिहिल्याची इतिहासात नोंद आहे. मराठी भाषेच्या या वैभवशाली अस्मितेचा व स्वाभिमानाचा पाया सर्वप्रथम श्रीचक्रधर स्वामींनी व त्यांच्या महानुभाव पंथाने रचला आहे. ज्याप्रमाणे हिंदी भाषेचे विद्यापीठ महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा येथे स्थापन करुन हिंदी भाषेचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे रिद्धपूर येथे श्रीचक्रधर स्वामी मराठी विद्यापीठ स्थापन करुन राज्य शासनाने मराठी भाषेचा गौरव करावा, अशी मागणी महंत प्रज्ञासागरबाबा यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेस उद्धवराज प्रज्ञासागर महानुभाव, अर्लकमुनी प्रज्ञासागर महानुभाव आदी उपस्थित होते.
मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरलाच हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 12:39 AM