संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अचानक आग लागल्यावर ती विझवण्यासाठी पूर्वी वाळूचा उपायोग होत होता. ज्यावेळी कार्बनडाय आॅक्साईडच्या सिलिंडरचा शोध नव्हता, त्यावेळी बसस्थानक, रेल्वेस्थानक अथवा अन्य शासकीय कार्यालयात वाळूने भरलेल्या बादल्या हमखास दिसत. हा आज जरी इतिहास असला तरी, आजची स्थिती उलट झाली आहे, आग विझवणाऱ्या नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे पर्यावरण धोक्यात तर आलेच आहे, परंतु गेल्या दहा वर्षाचा विचार करता, अवैध वाळू उपसा, त्याची वाहतूक यातून अंदाजे शंभर कोटीची हेराफेरी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे.अवैध वाळूचा मुद्दा आ. विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत मांडून मोठी खळबळ उडवून दिली. यात गोदावरी नदीपात्राच्या जालना आणि बीड हद्दीतून कशी वाळू उपसली जाते आणि त्यातून अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य संंबंधित कंत्राटदार कसे गब्बर झाले आहेत, याची यादीच सभागृहात झळकवली. आणि त्याची गंभीर दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली. बीड आणि जालन्यातील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली असून, त्याचा अहवाल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वरिष्ठांना सादर केला आहे. त्याचा काय परिणाम होतो ते येत्या आठवडाभरात दिसेल. असे असले तरी, अंकुशनगर येथील छत्रपती हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे शिक्षक विजय जाधव यांनी हा अत्यंत हॉट परंतु तेवढाच गंभीर विषय घेऊन आपलीपांढरकवडा ही कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी त्यांच्या लहानपणीची गोंदी, कुरणसह अन्य गावांमध्ये असलेली नदीपात्रातील संपन्नता दर्शवली आहे. वाळू पात्रात पूर्वी क्रिकेट खेळतांना हाताने अर्धा फूट खड्ड केल्यावर लगेच पाण्याचा झरा लागायचा आणि त्यातील नितळ पाणी पिऊन सर्व बच्चे कंपनी आपली तहान भागवत असत. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात या नदीपत्रातून अक्षरश: जेसीबी, पोकलेनने वाळू ओरबडून घेतली आहे. या वाळूच्या व्यवसायाने अनेक तरूणांना व्यसनाधीन केले आहे. केवळ अधिका-यांची टीप देणा-यास ५०० रूपये मिळतात. तसेच गावांमध्ये कधीच एवढे ट्रॅक्टर, ट्रक, हायवा दिसत नव्हत्या, त्यांचा तर आज सुळसूळाट झाला आहे. गोदापत्राची संपन्नताच नष्ट झाली आहे. याला ज्या प्रमाणे येथील प्रशासन जबाबदार आहे, त्याच प्रमाणे तेथील नागरिकही तेवढेच जबादार म्हणावे लागतील. अवैध वाळूचा उपसा करणा-यांना आपल्या शेतातून रस्ता करून देण्यासह वाळू माफियांना मिळणारी गावकºयांची अप्रत्यक्ष साथ हा देखील एक गंभीर विषय समोर आला आहे.कादंबरीचा एमए. च्या अभ्यासक्रमात समावेशविजय जाधव यांनी २४८ पानांची लिहिलेल्या या पांढरकवड्या कादंबरीची दखल नांदेड येथील स्वराती विद्यापीठाने घेतली असून, एमए च्या व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. जाधव यांनी यापूर्वीही शेतक-यांच्या व्यथा मांडणारी दाखला ही कादंबरी लिहिली असून,त्यांना बाबूराव बागूल यांच्या नावाने पुरस्कार मिळाला आहे. साने गुरूजी या पुस्तकाचे जाधव यांनी इंग्रजीत भाषांतर केले.
आग विझवणारी वाळूच जेव्हा पेटते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:33 AM