जालना : मराठी भाषा संवर्धन ही सर्व मराठी भाषिकांची जबाबदारी आहे. मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करायचे असेल तर माझी मराठी भाषा ही माहिती तंत्रज्ञानाची, विज्ञानाची आणि भाकरीची भाषा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य मराठी विकास संस्था, मुंबईचे माजी विभागीय समन्वयक डॉ. एकनाथ शिंदे यांनी केले.
शहरातील जेईएस महाविद्यालयातील मराठी भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ कार्यक्रमाच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी डॉ. जवाहर काबरा, डॉ. यशवंत सोनुने यांची उपस्थिती होती.
डॉ. शिंदे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येकाला इथली महाराष्ट्रीय अर्थात मराठी भाषा शिकणे हे बंधनकारक असावे. शिवाय नोकरीसाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असेल, तर मराठी भाषेला नक्कीच चांगले दिवस येतील, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज पडणार नाही. त्यासाठी मराठीच्या विविध बोली जतन करणे, त्यांचे संगोपन करणे, त्यांचा विकास करणे आणि मराठी बोलीच्या व्याकरणावर काम करणे आवश्यक आहे. म्हणून मराठी भाषिकांनी दुटप्पी भूमिका घेण्याऐवजी रास्त व प्रामाणिक भूमिका घेऊन मराठी भाषा विकसित करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी व्हावी, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. बजाज म्हणाले, मराठी भाषा अडचणीत नसून मराठी भाषिक अडचणीत आहेत; कारण त्यांना मातृभाषेची लाज वाटते. त्यामुळे त्यांनीच भाषा संवर्धनात पुढे येणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषा चांगली आली तरच जगातील भाषा त्यांना अवगत होतील. म्हणून विद्यार्थ्यांनी अगोदर मातृभाषा नीट शिकावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.