टेंभुर्णी ( जालना ) : जाफराबाद तालुक्यातील काळेगाव शिवारात एक बिबट्या बुधवारी रात्री विहिरीत पडला. दरम्यान वनविभाग व ग्रामस्थांनी केलेल्या दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. दरम्यान बिबट्या पकडला गेल्याने तूर्त शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला असला तरी परिसरात आणखी काही बिबट्यांंचा विहार असावा म्हणून परिसरातील शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मराठवाडा- विदर्भ सीमेवर काळेगाव शिवारात शेतकरी सुखदेव बनकर यांच्या शेतातील विहिरीत एक नर जातीचा बिबट्या अचानक पडला. गुरुवारी सकाळी शेतातील मोटरपंप सुरू करण्यासाठी सुखदेव बनकर हे शेतात गेले असता त्यांना विहिरीतून डरकाळीचा आवाज आला. त्यांनी विहीरीत डोकावले तर त्यांना बिबट्या पोहताना दिसला. बनकर यांनी लगेच आजुबाजुंंच्या शेतकऱ्यांना ही वार्ता कळविली.
ही वार्ता गावात कळताच परिसरातील काळेगाव, कुंभारझरी, खल्ल्याळ गव्हाण येथील ग्रामस्थांनी विहिरीवर एकच गर्दी केली. लगेच टेंभुर्णी पोलीसांसह वनविभाग कर्मचाऱ्यांना ही खबर देण्यात आली. टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी हजर झाले. यावेळी त्यांनी तेथील गर्दी नियंत्रणात आणली. बिबट्या पाण्यात बुडून मरू नये म्हणून तोपर्यंत ग्रामस्थांनी दोरीला बांधून एक बाज आत सोडली. पाण्यात पोहून पोहून थकलेला हा बिबट्या क्षणात या बाजेवर आडवा झाला.
यानंतर थोड्याच वेळात जाफराबाद आणि देऊळगावराजा वनविभागाचे कर्मचारी पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पिंजरा विहिरीत सोडून त्यांनी काही तासातच बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात जाताच पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडला अन् जमलेल्या ग्रामस्थांनी तेथे एकच जल्लोष केला. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलात सोडले जाईल. तुर्त हा बिबट्या विदर्भ वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती जाफराबादच्या वनरक्षक सोनू जाधव यांनी दिली.
एक महिन्यापासून धुमाकूळदरम्यान मराठवाडा- विदर्भाच्या सीमेवरील खल्ल्याळ गव्हाण आणि काळेगाव शिवारात मागील एक महिन्यापासून या बिबट्याने धुमाकूळ घातला होता. परिसरातील काही वासरांचा त्याने फडशाही पाडल्याने जनतेत प्रचंड घबराट होती. या अगोदर वनविभागाचे कर्मचारी येवूनही गेले पण बिबट्या सापडला नव्हता. आता हा बिबट्या पकडला गेला असला तरी परिसरात आणखी बिबट्यांंचा विहार असावा म्हणून शेतकरी भीती व्यक्त करीत आहे. खडकपुर्णा धरणामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली जाते. सध्या ऊसतोड झाल्याने हे वन्यपशू बाहेर पडले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.