लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण विभागाकडून आवश्यक कुठलीही परवानी न घेता अनेकांनी शहरी व ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचा बाजार मांडला आहे. मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अशा शाळांंमध्ये प्रवेश न घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.सध्या सर्वत्रच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पीक आले आहे. इंग्रजीच्या मोहापाई पालकही कुठलीही खातरजमा न करता आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. याचा गैरफायदा घेत अनेकांनी ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची दुकाने थाटली आहेत. बिल्डिंग फंडसह अन्य वेगवेगळे शुल्क आकारून पालकांची लूट केली जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील बहुतांश इंग्रजी शाळांकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे नमुना दोनचे शाळा मान्यता प्रमाणपत्रही नाही. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे यांनी सांगितले, की अनधिकृत इंग्रजी शाळांबाबत शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. यामध्ये अंबड, जालना व बदनापूर तालुक्यातील काही शाळांचा समावेश आहे. पालकांनी या शाळांमध्ये आपल्या मुलांचा प्रवेश घेण्यापूर्वी अशा शाळांना शासनाची मान्यता आहे का, तसेच नमुना दोनमधील प्रमाणपत्र आहे की नाही याची खात्री करूनच प्रवेश द्यावा. आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही पालकांनी काळजी घ्यावे, असे कवाणे यांनी सांगितले.
अनधिकृत इंग्रजी शाळांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:37 AM