जालना : येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत असलेल्या राजुरी स्टीलच्या वर्कशाॅपसह अन्य भागात मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान मोठी आग लागली. ही आग विजेच्या ट्राॅन्सफार्मरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
आग लागल्याची माहिती तातडीने येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे दोन बंब राजुरी स्टील परिसरात आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. ही आग भयंकर असल्याने ती अटोक्यात आणताना अग्निशमन दलातील जवानांची मोठी कसरत झाली. ही आग रात्री ११ वाजतानंतरही सुरू होती. या आगातील कोणी जखमी आहे काय किंवा जीवितहानी झाली आहे काय, याबद्दल रात्री कुठलाच दुजोरा मिळू शकला नाही. आग विझविण्यासाठी पाण्याचे खासगी टँकरही मागविण्यात आले. परिसरातील नागरिक, कंपनीतील कामगारांनीदेखील आग नियंत्रणात आणण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.