लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयासमोर एमसीव्हीसी शिक्षकांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी उपोषण केले. यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.या मागण्यांच्या निवेदनामध्ये उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांची रूपांतर प्रक्रिया थांबविणे, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील विद्यार्थी संख्या पूर्ववत म्हणजेच एका तुकडीत वीस विद्यार्थी ठेवण्यात यावी, तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करणे, पायाभूत अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांची पर्यायी शैक्षणिक अर्हता एम.कॉम., बी.एड., एम.ए.(इकॉ.), बी.एड. करण्यात यावी. शिकाऊ उमेदवारी योजना शासन स्तरावरून प्रभावीपणे राबविण्यात यावी, राज्य व केंद्र शासनाच्या सेवा शर्ती नियमावलीत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा समावेश करावा, प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय शिक्षणाच्या दृष्टीने उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सैनिक भरतीसाठी पात्र ठरवावे यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.यावेळी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय लकडे, एस.पी.कदम, बरसाले, मोहन शिंदे, भारती यादव, वाडेकर, विजय कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती.
एमसीव्हीसी शिक्षकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:33 AM