लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कडक उन्हामुळे आहे त्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा फटका जलाशयातील पाणी साठ्याला बसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.लघु पाटबंधारे विभागाने बांधलेले जिल्ह्यात सात मध्यम तर ५७ लघू प्रकल्प आहेत. यातील एक मध्यम आणि २३ लघू प्रकल्पांची पाणी पातळी ही, जोत्याच्या खाली गेली आहे. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा बहुतांश प्रकल्पांमध्ये थोडेफार का होईना; पाणी शिल्लक आहे. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील पाणी चोरी करून शेतीला देणाऱ्यांवर कारवाई केल्याने हे पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. त्यातच जिल्ह्यात विविध ठिकाणी जलयुक्तची कामे झाल्यानेही त्याचा चांगला परिणाम भूगर्भातील पाणीपातळी वाढीस झाल्याचे लघू सिंचन विभागाकडून सांगण्यात आले.लघू प्रकल्पांमध्ये जालना तालुक्यातील वाकी, दरेगाव, जामवाडी, निरखेड तांडा, वानडगाव, कुंभेफळ, बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, भोकरदन तालुक्यातील बरंजळा, प्रल्हादपूर, पिंपळगाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, रेलगाववाडी. अंबड तालुक्यातील मार्डी, कानडगाव, भातखेडा, धनगर पिंप्री, खडकेश्वर, पानेगाव. घनसावंगी तालुक्यातील मुसा भद्रायणी, जांब समर्थ, मानेपुरी, बोर रांजणी. मंठा तालुक्यातील सारवाडी, वाई या गावांचा समावेश आहे. येत्या मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यात आहे. त्यामुळे पाणीपातळीमध्ये घट होणार असून, आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.मध्यम प्रकल्प : उपयुक्त जलसाठा केवळ २१ टक्क्यांपर्यंतसध्या जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ही २० टक्के असून, ५७ लघू प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा सरासरी २१ टक्के एवढा आहे. सहा पैकी भोकरदन तालुक्यातील धामना हा प्रकल्प जोत्याखाली गेलेला आहे. महिनाभरात यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
मध्यम प्रकल्प जोत्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:12 AM