जालना : औरंगाबाद- जालना विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांनी गुरूवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
औरंगाबाद- जालना मतदार संघामध्ये काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळख असलेल्या बाबूराव कुलकर्णींना यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. प्रत्यक्षात या निवडणुकीत युतीची सदस्य संख्या जास्त असल्याने त्यांचीही मते आपल्याकडे वळविण्यासाठी तर कुलकर्णी यांनी गुरूवारी खोतकरांची भेट घेतली नसेल ना? अशी चर्चा आहे. दरम्यान, युतीचे उमेदवार अंबादास दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी गुरूवारी सायंकाळी जवळपास अर्धा तास बंदद्वार चर्चा केली.
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबुराव कुलकर्णी व खोतकर यांच्या भेटीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही चर्चेला उधाण आले होते. या भेटीला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दुजोरा दिला. त्यामुळे या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र, गुलदस्त्यात आहे.