परतूर : शेगाव-पंढरपूर महामार्गावरील परतूर तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी खरोखरच जात असतील तर मोजमाप करून त्यांना मावेजा देण्यात येईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतक-यांना दिले. मात्र, मावेजा मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा पावित्रा यावेळी शेतक-यांनी घेतल्याने पेच कायम राहीला.
शेगाव- पंढरपूर मार्ग परतूर तालुक्यातून जात आहे. या रोडच्या रूंदीकरणात शेतक-यांच्या जमिनी जात असल्याचा आरोप श्रीष्टी, वाटूर, दैठणासह या मार्गावरील शेतक-यांनी करून या मार्गाचे कामही बंद पाडले होते. याबाबत शुक्रवारी तहसील कार्यालयात शेतक-यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण हे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
योग्य मोबदला देऊ पालकमंत्री लोणीकर म्हणाले, जमिनी पन्नास, शंभर वर्षापूर्वी रोडमध्ये गेल्या असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याचा मोबदला देता येणार नाही. आज या शेगाव-पंढरपूर मार्गात जर शेतक-यांच्या मालकीची जमीन, झाडे, पाईपलाईन, पिकांचे नुकसान होत असेल तर संबंधीत विभागाचे अधिकारी मोजमाप करून शेतक-यांना मोबदला देण्यास शासन कटिबध्द आहे. मात्र, शेतकरी जर शासनाच्या हद्दीत अतिक्रमण करून मोबदला मागत असतील तर हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तसेच तातडीने या जमीनचे मोजमाप करू, याची मोजणी शुल्कही शासन भरेल असेही लोणीकर यांनी सांगीतले.
जमिनीचे मोजमाप अगोदर करायावेळी जिल्हाधीकारी शिवाजी जोंधळे म्हणाले, शेतक-यांच्या जमिनी जर मालकीच्या असतिल तर, त्या भुसंपादीत करू. हा रोड रस्ता शेतातून जात असल्याची खात्री करा, मगच काम थांबवा. प्रत्येक शेतक-यांसाठी पाईप टाकून पाईप लाईन शासनाच्या खर्चाने दुरूस्त करून देवू असे महामंडळाचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी सांगितले. शेतक-यांनी रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी मोजमाप का केले नाही. यापूर्वीही संपादीत केलेल्या जमिनीचा मावेजा दिलेला नाही. आताही आमच्या जमिनी, शेत, झाड, पिक या रोडच्या कामात जात आहे. मात्र, मावेजा देण्या विषयी काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे संपादीत करावयाच्या असलेल्या जमिनीचे मोजमाप अगोदर करा, मावेजा दया व नंतरच काम सुरू करा असा पावित्रा शेतक-यांनी घेतल्याने या बैठकीत पेच कायम राहीला. या बैठकिस जि. प. सदस्य राहुल लोणीकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेस पाटील, तहसीलदार डी. डी. फुपाटे, शेतकरी बाळासाहेब अंभुरे, प्रशांत अंभुरे, रामराव अंभुरे, शिवदास गवळी, प्रकाश अंभुरे, प्रविण अंभुरे, शेख रहीम, धनंजय अंभूरे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.