टेंभुर्णी : संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या गटविमा गृहनिर्माण घोटाळ्यासंदर्भात जाफराबाद तालुक्यातील शिक्षक सभासदांनी गुरुवारी सहाय्यक निबंधक कल्पना शहा यांची भेट घेतली. यावेळी शिक्षक सभासदांनी या गृहनिर्माण संस्थेच्या संपूर्ण कागदपत्रांसह घरे ताब्यात मिळावी, म्हणून लेखी निवेदनही दिले.
राजा उज्ज्वल गृहनिर्माण संस्था अ व ब च्या सभासदांची संबंधित बिल्डरकडून मोठी फसवणूक झाली असून, मागील १० वर्षांपासून या बिल्डरचा संपर्क होत नाही. या गृहनिर्माण संस्थेने सभासद शिक्षकांच्या नावे गटविमा योजनेतून २००५ मध्ये परस्पर कर्ज काढून घेतले आहे. मात्र, अद्यापपर्यंत संबंधित घरे सभासदांच्या ताब्यात मिळालेली नाहीत. मागील १५ वर्षांपासून सभासद शिक्षक घरांचा ताबा मिळाला नसतानाही विनाकारण व्याजाचा भुर्दंड भरीत आहेत. यात अनेक सभासद शिक्षक सेवानिवृत्त झाले असताना त्यांच्या सेवानिवृत्ती लाभातून या घरांसाठी उचललेल्या कर्जाची मोठी रक्कम परस्पर कपात केली जात आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या सभासद शिक्षकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वेळीच घोटाळ्याचा तपास करून संबंधित बिल्डरचा शोध घेऊन मूळ कागदपत्रांसह बांधलेली घरे सुस्थितीत आमच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी यावेळी सभासद शिक्षकांनी केली. या प्रसंगी गटविमा समितीचे प्रदीप साळोख, अंकुश इंगळे, संजय निकम, सुधाकर चिंधोटे, दत्तू मुनेमानिक, रमेश बनकर, दगडुबा देठे, गजानन डोमळे, शेख बुरहाण, समाधान कोरडे, नामदेव सुतार, स्वामी वानखेडे, शिवाजी शेवत्रे आदींची उपस्थिती होती.
कोट
केवळ जाफराबाद तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर गटविमा गृहनिर्माण अंतर्गत शिक्षकांसह अनेक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. कोट्यवधीच्या या गृहनिर्माण घोटाळ्याविरोधात गृहनिर्माण कृती समितीतर्फे ही घरे ताब्यात घेण्यासाठी आंदोलन छेडले गेले आहे. या घोटाळ्याची शासनाने चौकशी करून व्याजाचा भुर्दंड माफ करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
फकिरा वाघ, राज्य अध्यक्ष, गृहनिर्माण कृती संघर्ष समिती, जालना.