मुंबईत पक्षश्रेष्ठींना भेटले जालना जिल्हा काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:36 AM2019-03-15T00:36:56+5:302019-03-15T00:37:12+5:30
जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी सभापती तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाव्दारे केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आगामी लोकसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी सभापती तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य भीमराव डोंगरे यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाव्दारे केली. ही भेट गुरूवारी दुपारी मुंबईत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार कोण या बाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे असताना उमेदवारी कोणाला द्यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे पक्ष श्रेष्ठींनी नावे मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिका-यांनी मुंबईत जाऊन ही मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली. यावेळी काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या समक्ष लेखी अर्ज सादर केला.
यावेळी जालना जिल्ह्यातीलच उमेदवाराला उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसने विचार करावा अशी मागणी केली. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यात जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. आ. कल्याण काळे यांनी निवडणूक लढावावी अशी विनंती त्यांना यापूर्वीच केली होती, मात्र त्यांची यावेळी लढण्याची इच्छा नसल्याने त्यांच्या ऐवजी भीमराव डोंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी गुरूवारी शिष्टमंडळाने केली.
या शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य कल्याण दळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद,मनोज पाटील यांच्यासह अन्य पदाधिका-यांची उपस्थिती होती. पुढील आठवड्यात काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जिल्हा काँग्रेस समितीने दिलेला अर्ज हा दिल्लीतील हाय कमांडकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतरच उमेदवाराचा निर्णय होणार आहे.