टेंभुर्णी : निवडणूक संपली की, राजकारण विसरले पाहिजे. आता तुम्ही केवळ भाजपचेच नाही तर संपूर्ण गावाचे ग्रामपंचायत सदस्य आहात. जनहितासाठी स्वत:ला झोकून देत आगामी पाच वर्षांत जनतेचा विश्वास संपादन करा, असे विचार केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी सायंकाळी टेंभुर्णी येथे आले असता ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या येथील भाजपच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी माजी शिक्षण सभापती राजेश चव्हाण, माजी सभापती विजय परिहार, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, सर्जेराव शिंदे, दगडुबा गोरे, साहेबराव मोरे, माधव अंधारे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, गणेश धनवई, माजी उपसरपंच फैसल चाऊस, इंद्रराज जैस्वाल, सर्जेराव कुमकर, भिकनखा पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ना. दानवे म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेने तुमच्यावर विश्वास टाकून ग्रामपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता दिली. जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता प्रत्येक सदस्याने जनकल्याणाच्या योजना गावात सर्वार्थाने राबवाव्यात. यासाठी मी व आ. संतोष दानवे सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत, असेही ते म्हणाले.
फोटो
टेंभुर्णी येथे आले असता ना. रावसाहेब दानवे यांचे औक्षण करून स्वागत करताना नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्या सुशीला कुमकर.