अमोल राऊत
तळणी : वडिलोपार्जित शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कानडी (ता. मंठा) येथील खंदारे बंधूंनी सव्वा एकरमध्ये द्राक्ष बाग फुलविली आहे. या द्राक्षबागेत उत्पादित होणारे द्राक्ष विकत घेण्यासाठी राज्यासह मध्यप्रदेशातील व्यापारी येत आहेत.
कानडी येथील आश्रुबा वामन खंदारे व राजेश वामन खंदारे यांच्याकडे वडिलोपार्जित वीस एकर शेतजमीन आहे. खंदारे हे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पिके घेत होते. परंतु, त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. आश्रुबा खंदारे हे महाविद्यालय प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करीत होते. उच्चशिक्षित असतानाही शेती पेक्षा नोकरी उत्तम या मानसिकतेला छेद देत त्यांनी नोकरी सोडून त्यांनी शेती कामाला प्रारंभ केला. एकत्रित कुटुंब पद्धत जोपासत भावाच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक एकरमध्ये द्राक्ष बाग फुलविली आहे. मे २०१८ मध्ये लागवड केल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत योग्य संगोपनासाठी कडवंचीचे डाॅ. दत्ता शेळके यांनी मार्गदर्शन त्यांना केले. या दरम्यान एक लाख रूपये पर्यंतचा खर्च झाला आहे. उत्पन्नाचे हे दुसरे वर्ष असून, जवळपास दोनशे क्विंटल माल निघण्याची आशा खंदारे बंधूंनी व्यक्त केली. शिवाय मध्यप्रदेशातील अनेक व्यापारी या बागेला भेट देत असून, योग्य दर मिळाला तर हा माल मध्यप्रदेशातील बाजारपेठेत पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खंदारे बंधूंनी फुलविलेली बाग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे भूषण मापारी यांनी सांगितले.
आठ लाखांचे उत्पन्न अपेक्षित
वातावरणातील बदलांचा सामना करीत आम्ही द्राक्ष बाग जोपासली आहे. योग्य संगोपनामुळे द्राक्षे मोठ्या प्रमाणात लगडली आहेत. राज्यासह मध्यप्रदेशातील व्यापारी द्राक्षे पाहण्यासाठी येत असून, योग्य भाव मिळाला तर ती विक्री केली जाणार आहेत. आम्हाला जवळपास आठ लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे आश्रुबा खंदारे म्हणाले.