लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजकारण बाजूला ठेवून जालना शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेला जालना महोत्सव हा एकतेचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी येथे केले.येथील कलश सीड्स मैदानावरील स्व. शारदादेवी पित्ती नगरीत सुरू असलेल्या जालना महोत्सवात सोमवारी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी आ. राजेश टोपे हे अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग, आ. प्रशांत बंब, सिने अभिनेता सयाजी शिंदे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, ओमप्रकाश मंत्री, महिकोचे चेअरमन राजेंद्र बारवाले, उद्योजक संजय मुथा, उपाध्यक्ष राजेश राऊत,दीपक भुरेवाल आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी रामदास कदम म्हणाले की, जनतेच्या विकासासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र बघण्याचा प्रसंग आपणास जालना शहरात या जालना महोत्सवात बघायला मिळत आहे. जालना शहराची संस्कृती देशभराने स्वीकारावी अशी आहे. जालनेकर राजकारण बाजूला ठेवून सांस्कृतिक कार्यक्रम घेतात, हे चित्र आनंददायी आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून एकतेचा संदेश दिला जातो. आपण देखील कोकणामध्ये असाच महोत्सव सुरू करणार असल्याचे कदम म्हणाले.सिने अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, राजकारण बाजूला सारून सर्व नेत्यांनी तसेच जनतेने पर्यावरणावर भर दिला पाहिजे. झाडे जगवून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. देश पुढे गेला तरच शेतकरी प्रगती करेल, असे ही ते म्हणाले. यावेळी रमेशचंद्र बंग म्हणाले की, आपल्या मारवाडी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून विकासात्मक कार्य केले जात आहे. सर्व सामान्य व्यक्तींचा विकास हाच दृष्टीकोन समोर ठेवून फाऊंडेशन कार्य करीत आहे, असे ते म्हणाले. यावेळी अंकुश देशमुख व राजेंद्र तापडिया यांचा गौरव करण्यात आला तसेच मंगलगाणी-दंगलगाणी या कार्यक्रमाचे निर्माते अशोक हांडे यांचाही गौरव करण्यात आला. प्रारंभी जालना महोत्सवाचे स्वागताध्यक्ष बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच जालना महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम गोयल, सुदेश करवा, ब्रिजमोहन लड्डा, उमेश पंचारिया, सुनील राठी, विजय जैन आदींच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर मनिष तवरावाला यांनी आभार मानले. यावेळी गौतम मुनोत, सुनील दायमा आदींची उपस्थिती होती. यानंतर अशोक हांडे निर्मित मंगलगाणी-दंगलगाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
महोत्सवातून एकतेचा संदेश- कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:28 AM