जालना : सर्वत्रच महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यात ऐण सणासुदीत मिठाईचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसू लागला आहे.
गतवर्षीच्या गणेशोत्सव कालावधीत आणि चालू वर्षाच्या गणेशोत्सवात मिठाईच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: दूध, साखरेचे दर कायम असताना मिठाईचे वाढलेले दर ग्राहकांसाठी खिशाला कात्री लावणारे ठरत आहेत. काही मिठाई विक्रेते कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे सांगत आहेत. आता गॅससह इतर वस्तूंच्या किमती आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात वाढलेले हे दर आता दिवाळीच्या कालावधीत आणखी वाढण्याची चिन्हेही काही मिठाई चालक व्यक्त करीत आहेत.
का वाढले दर ?
आमचा व्यवसाय तेलावर अवलंबून आहे. गतवर्षी तेल ९० रुपये किलो होते. यंदा ते १६० रुपयांवर गेले आहे. शिवाय इतर कच्च्या मालाचे दरही वाढले आहेत. पर्यायाने आम्हालाही मिठाईचे दर हे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये वाढवावे लागले आहेत.
- जगदीश पुरोहित
मिठाई तयार करण्यासाठी लागणारे तेल, गॅस यांसह इतर कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. कच्च्या मालाचे दर वाढल्याने आम्हाला मिठाईचे दर वाढवावे लागले आहेत. दरामध्ये काहीशी वाढ केली तरच आमच्या हाती काही तरी उत्पन्न पडणार आहे.
- राजेश शिंदे
ग्राहक म्हणतात...
सर्वत्र महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यात सणामध्ये लागणाऱ्या मिठाईचे दर वाढल्याने आर्थिक झळ सहन करावी लागते. परंतु, सण साजरा करण्यासाठी मिठाई खरेदी करावी लागते.
- बद्रीनाथ गायकवाड
एकीकडे इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे ऐन सणासुदीत मिठाईचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना फटका सहन करावा लागत आहे.
-आनंद मोरे
भेसळीकडे लक्ष असू द्या
मिठाई खरेदी करताना त्यावरील कालमर्यादेची तारीख पाहावी.
अनेकजण उघड्यावर मिठाईची विक्री करतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो.
मिठाई खरेदी करताना ती किती दिवसांपूर्वी तयार केली आणि कोणते साहित्य वापरले, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
दरांवर नियंत्रण कोणाचे?
अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी मिठाई विक्रेत्या दुकानांची तपासणी केली जाते. कोणी नियम मोडत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु, मिठाईचे दर विक्रेते ठरवितात. मिठाईसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर त्यासाठी महत्त्वाचे आहेत.
मिठाईचे दर (प्रतिकिलो)
साधा पेढा २७०
२८०
मलई पेढा ३००
३२०
माेतीचूर लाडू १६०
१८०