माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं, असं वक्तव्य शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. तसेच जुळवून घेतलं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल, असा टोलाही अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
भाजपाला कंटाळून शिवसेनेने युती सरकारच्या काळातच काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. शिवसेना नेते मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले होते. या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे होते, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावर देखील अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलं आहे. मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेंकडे सत्ता स्थापनेची विनंती घेवून गेलो होतो, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
तत्पूर्वी, २०१४ मध्ये राज्यात असलेल्या फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन आलेल्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे हे देखील होते, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेना नेत्यांनीही दुजोरा दिला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडीला आता विरोध करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशोक चव्हाण यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणावर भाजपाने मात्र हा उद्धव ठाकरेंचाच डाव असल्याचा दावा केला आहे.
अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल. उद्धव ठाकरेंनीच तसं ठरवलं असेल आणि एकनाथ शिंदे निरोप घेऊन गेले असतील, असं मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार असताना एकनाथ शिंदे हे नेते नव्हते. तेव्हा नेते उद्धव ठाकरेच होते. त्यामुळे भाजपसोबत दगाबजीचा तो निर्णय उद्धव ठाकरेंचाच असेल, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.