जालना : राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अफराज शेख हे जिल्हा प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर जाम चिडले. गुरूवारी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक आयोगाच्या निधी संदर्भातील आढावा बैठक ठेवली होती. परंतु, यावेळी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पोलीस दलातील एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याने ते जाम चिडले होते. ते बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याने खळबळ उडाली असून, याचा आढावा आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अफराज शेख हे गुरूवारी जालना दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी विश्रामगृहावर अल्पसंख्यांक समाजातील वेगवेगळ्या शिष्टमंडळाशी चर्चा करून अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. याचवेळी लोकमतशी बोलताना ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी १५ कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु, काही जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ३६ पैकी जवळपास २६ जिल्ह्यांचा दौरा आपण पूर्ण केला आहे. यावेळी स्मशानभूमी, विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह, शैक्षणिक कर्ज या बद्दलच्या तक्रारी आढळून आल्या. आपण अध्यक्ष झाल्यापासून दिलेल्या प्रत्येक निवेदनाला त्यावर कार्य निर्णय झाला याबद्दल संबंधित तक्रारदाराला पत्र पाठवून त्याचे समाधान केले जात असल्याचे ते म्हणाले.