जालना : फ्रिफायर गेममध्ये जिंकलेल्या १०० रूपयांवरून अल्पवयीन मुले समोरासमोर भिडल्याची घटना जालना शहरातील मोतीबाग परिसरात रविवारी रात्री घडली. यात सहा जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी आठ अल्पवयीन मुलांविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुखीनगर येथील अल्पवयीन फिर्यादी ऑनलाईन फ्रिफायर गेम खेळतो. गेम खेळतांना त्याची ओळख संशयितासोबत झाली. १८ मार्च रोजी फ्रिफायर गेमचे १०० रूपये अल्पवयीन संशयिताला देण्याचे ठरले होते. रविवारी रात्री सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अल्पयवीन संशयिताने फोन करून फिर्यादीला शिवीगाळ केली. मोतीबागजवळ लवकर पैसे आणून दे असे तो म्हणाला. फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत दुचाकी घेऊन मोतीबाग परिसरात गेला. त्याचवेळी संशयितांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
फिर्यादीने मित्रांना बोलावून घेतले. परंतु, आठ संशयित आरोपींनी सहा जणांवर चाकूने वार करून जखमी केले आहे. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.