शहागड : मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या आंदोलनातील मागण्यांबाबत विधानसभेत चर्चा झाली. परंतु अशोक चव्हाण आणि प्रवीण दरेकर हे केवळ एकेकांना प्रश्नोत्तरे करीत राहिले. त्यातून अपेक्षित काही साध्य झालेले नाही. त्यामुळे सत्ताधारी, विरोधक केवळ मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील ४४ दिवसांपासून साष्टपिंपळगाव येथे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल घेऊन मागण्यांसाठी विधानसभेत चर्चा झाली. राज्य सरकार म्हणते, केंद्रीय कायदामंत्री यांना चर्चाचे निमंत्रण दिले होते आणि विरोधी पक्षनेते म्हणतात निमंत्रण दिलेच नव्हते. सत्ताधारी, विरोधकांची चर्चा पाहता, केवळ मराठा समाजाची दिशाभूल सुरू असल्याचे दिसून येत आहे. शासनाने आता तातडीने श्वेतपत्रिका काढून पाणी का पाणी आणि दूध का दूध करावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले. मराठा आरक्षणाबरोबर काही दगा फटका केल्यास उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी माऊली बोचरे, हकिम आतार, राजू ससाणे, दीपक बोचरे, सुदाम जाधव, भागवत तात्या औटे, शरद कटारे, भीमराव औटे, नीलेश बोचरे आदींची उपस्थिती होती.