जळगाव/जालना : काँग्रेसमधून निलंबित झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आलेल्या सत्तार यांनी महाजन यांच्याशी ४० मिनिटे चर्चा केली. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही भोकरदन (जालना) येथील निवासस्थानी भेट घेतली व चर्चा केली.
सकाळी ११ वाजता सत्तार महाजन यांच्या निवासस्थानी आले. काही वेळ त्यांनी कार्यकर्त्यांसमोर महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महाजन त्यांना घेऊन मागील दाराने दुसऱ्या खोलीत गेले. तेथे त्यांनी तब्बल ४० मिनिटे चर्चा केली. सत्तार माझे चांगले मित्र आहे. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ते आले होते, असे महाजन यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्याशीही फोनवरून अब्दुल सत्तार यांचे बोलणे झाले.
आपण राधाकृष्ण विखे यांच्या नेत्तृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. मात्र माझा मतदारसंघ हा रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे मला भाजपमध्ये प्रवेशासाठी दानवे यांची सहमती लागणार आहे. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. आमच्या सोबत काँग्रेसचे दहा आमदार प्रवेश करणार आहेत. - अब्दुल सत्तार, आमदार