अंबड ( जालना ) : लॉकडाऊन काळातील वाढीव बिलावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. महावितरणच्या अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता यांना सोमवारी (दि. २४) दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी वाढीव बिलाबाबत जाब विचारला. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून महावितरणच्या कारभाराचा निषेध केला.
लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेणे महावितरण कंपनीने बंद केले होते. त्यामुळे सरासरीच्या 10% बिल ग्राहकांना ऑनलाइन पाठवण्यात येत होते. जून महिन्यात रिडिंग घेऊन ग्राहकांना बिल पाठवण्यात आले. मात्र, हे बिल बघून ग्राहक चक्रावले आहेत. महिन्याला साधारणत: 500 ते 700 रुपये बिल येणाऱ्या ग्राहकांना 3 महिन्याचे साडेतीन हजार ते चार हजार रुपये बिल आले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना खाण्याचा प्रश्नाला समोरे जावे लागतेय. यातच हजारो रुपये कुठून आणायचे हा प्रश्न आहे.
यामुळे वीज ग्राहकांचे तीन महिन्यांचे बिल माफ करावे, उर्वरित बिलाची रक्कम सवलत देऊन टप्प्याटप्यांने वसूल करावी, वीज जोडणी खंडीत करुन नये अशी मागणी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. याचे निवेदन महावितरणच्या अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी कार्यालयावर हल्लाबोल केला. मनसेचे बळीरामा खटके, पंडित पाटील, कृष्णा गोरे यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध केला.