लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या पाच वर्षापासून यशस्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली संपूर्ण देशात ओळख झाली आहे, जोड-जमाव करून विजयश्री खेचून आणल्याने पक्षाचा मोठा विश्वास तुमच्यावर आहे, त्यामुळे आता जर पुन्हा केंद्रात मोदी सरकार आल्यावर तुम्हांला केंद्रीय ग्राम अथवा कृषी खाते मिळेल काय, या प्रश्नावर दानवेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. अरे भाई कल किसने देखा..असे सांगून या मुद्याला त्यांनी बगल दिली. एकूणच महाराष्ट्रात युतीचेच सर्वात जास्त खासदार विजयी होणार असून, विधानसभेतही भाजप-शिवसेना युती कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.दानवेंची प्रकृती निवडणुकीपासून पाहिजे तेवढी ठणठणीत नव्हती, त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. दानवेंना चेन्नईला हलवले, दानवें उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत, अशा एक ना अनेक अफवा होत्या. त्या अफवांना गुरूवारी खुद्द दानवेंनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करून खोडून काढले. आपली प्रकृती ठणठणीत असून, कोणाशीही कुस्ती लढण्यास तयार असल्याचा टोला त्यांनी लगावला. अंबड येथील एका सभेत उन्हामुळे प्रचंड त्रास झाला होता, त्यामुळे डॉक्टरांनी सक्तीचा आराम करण्यास सांगितले होते. त्यानंतर आता मी तुमच्यासमोर उभा आहे. असे सांगून, देश तसेच राज्यातील निवडणुकीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्रात काही ठिकाणी निसटता विजय तर काही ठिकाणी घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. युतीचे ३५ पेक्षा अधिक खासदार विजयी होतील असे सांगून, काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे, परंतु हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात १२ पेक्षा अधिकचा आकडा ओलांडू शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला.
केंद्रातील मंत्रीपदाबाबत दानवेंची सावध भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 1:13 AM