नाणे घेण्यास बँकांचाही नकार
लोकमत न्यूज नेटवर्क :
जालना : दहा रुपयांचे नाणे सध्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पैसे असूनही ते खोटे असल्याचा दावा वेगवेगळ्या व्यापारी, लहान दुकानांमधून केला जात आहे. त्यातच बँकांकडे हे नाणे मोठ्या प्रमाणावर घेऊन गेल्यास त्या देखील स्वीकारत नसल्याचे वास्तव आहे. दोन ते तीन टप्प्यांमध्ये ही नाणी आणावीत, असे आवाहन बँकांकडून केले जात आहे.
कुठल्याच नाण्यांवर बंदी नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आजघडीला कुठल्याच नाण्यांवर बंदी घातलेली नाही. परंतु केवळ गैरसमजातून दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून जवळपास बाद झाले आहे. व्यापाऱ्यांकडेही मोठ्या प्रमाणावर दहा रुपयांची रोकड जमा झालेली आहे. याकडे रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन ही नाणी चलनात कायम आहेत, याबद्दलचा समाधानकारक खुलासा करणे काळाची गरज आहे.
कोणती नाणी नाकारतात
सद्य:स्थितीत केवळ दहा रुपयांची नाणी नाकारली जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण सामान्यांसाठी डोकेदुखी ठरत असून नाणे असूनही ते रेल्वे, बस तसेच अन्य लहान दुकानांमधून हे स्पष्टपणे नाकारले जात आहेत.
पैसे असून अडचण
सध्या एक रुपये, दोन रुपये आणि पाच रुपयांची नाणी कोणीही विनाअडचण घेत आहेत. परंतु दहा रुपयांच्या नाण्याला मात्र, नाकारत आहेत. यामुळे पैसे असूनही अनेकवेळा हे नाणे चालत नसल्याचे सांगून व्यापारी आणि छोटे दुकानदार नकार देत आहेत.
- राजेश खिल्लारे
अनेकवेळा आपल्या खिशात दहा रुपयांचे नाणे आहे म्हणून थेट बाजारात जातो. परंतु तेथे गेल्यानंतर दुकानदार हे नाणे चालत नाही, असे सांगतात. त्यामुळे पैसे असूनही बाजारातून काहीही खरेदी न करता परत येण्याची नामुष्की ओढावत आहे.
- रोहित सीरसाट
बँकांमध्येही नाण्यांचा मोठा साठा
मध्यंतरी व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर सुट्या पैशांची गरज भासत होती. ती स्थिती आज बदलली आहे.
यामुळे बँकांमध्येही मोठ्या प्रमाणावर नाण्यांचा साठा शिल्लक असून, याचे करावे काय, हा मोठा प्रश्न आहे.
सध्या चलनात असलेले कुठलेच नाणे बाद झालेले नाही. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे नाकारणे चुकीचे आहे. हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.
- प्रेषित मोघे